
धाराशिव, 19 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागातील महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा आणि कृषीविषयक सेवांचा लाभ मिळणार तरी कसा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कृषी विभागातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती, तांत्रिक मार्गदर्शन तसेच आवश्यक कृषीविषयक सेवा वेळेवर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कृषी विभागातील मनुष्यबळाची कमतरता ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची ही उदासीनता संतापजनक आहे. एका बाजूला शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि मदतीच्या घोषणा केल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या कृषी विभागातच अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसतील, तर त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून विभाग सक्षम करावा. शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती आणि कृषीविषयक सेवा वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रतापसिंह पाटील यांनी केली. “शेतकऱ्यांना केवळ घोषणा नकोत; प्रत्यक्षात सक्षम व्यवस्था आणि आवश्यक सेवा हव्यात,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis