दुर्मिळ काळ्या छातीच्या सुगरणीची वर्ध्यात प्रथम नोंद
वर्धा , 19 ऑगस्ट (हिं.स.) जिल्ह्याच्या समृद्ध पक्षीवैविध्यात आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याची भर पडली आहे. काळ्या छातीच्या सुगरण (ब्लॅक-ब्रेस्टेड वीव्हर) या दुर्मिळ सुगरण पक्ष्याची वर्धा जिल्ह्यात प्रथमच छायाचित्रीत नोंद करण्यात आली आहे. समुद्रपूर
दुर्मिळ काळ्या छातीच्या सुगरणीची वर्ध्यात प्रथम नोंद


वर्धा , 19 ऑगस्ट (हिं.स.) जिल्ह्याच्या समृद्ध पक्षीवैविध्यात आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याची भर पडली आहे. काळ्या छातीच्या सुगरण (ब्लॅक-ब्रेस्टेड वीव्हर) या दुर्मिळ सुगरण पक्ष्याची वर्धा जिल्ह्यात प्रथमच छायाचित्रीत नोंद करण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात या पक्ष्याचे दर्शन झाले. उंच गवतामध्ये घरटी बांधतांना नर व मादी असे एकूण सहा पक्षी आढळले व त्याठिकाणी पाच अर्धवट बांधलेली घरटी होती. घरटी बनविण्याचे काम सुरू असलेले दिसले. हिंगणघाट शहरातील पक्षी अभ्यासक व सर्पमित्र प्रविण कडू (हिंगणघाट भूषण), वर्धा शहरातील पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकारे, यशवंत शिवणकर आणि अनिल गडवानी यांनी या महत्त्वपूर्ण पक्ष्यांची नोंद केली. मराठीत काळ्या छातीची सुगरण, इंग्रजीत ब्लॅक-ब्रेस्टेड वीव्हर आणि शास्त्रीय भाषेत प्लोसियस बेंगालेन्सिस म्हणून ओळखला जाणारा हा सुगरण पक्षी कुळातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहे. वर्धा जिल्ह्यात या पक्ष्याची यापूर्वी नोंद उपलब्ध नसल्याने ही नोंद जिल्ह्याच्या पक्षी अभ्यासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप

सुमारे १५ सेंटीमीटर लांबीचा आणि १८ ते २२ ग्रॅम वजनाचा हा पक्षी आपल्या आकर्षक रंगसंगतीमुळे सहज ओळखू येतो. प्रजनन काळातील नराच्या कपाळाचा भाग पिवळा, तर चेहरा, मानेचा मागील भाग आणि छातीचा मोठा भाग काळ्या रंगाचा असतो. शरीराचा वरील भाग तपकिरी, तर खालचा भाग तुलनेने फिकट रंगाचा दिसतो. गवताळ प्रदेश, पाणथळ जागा आणि उंच गवत असलेल्या अधिवासात या पक्ष्याचा वावर आढळतो.

पूर्व विदर्भात नोंदी

वर्ध्यात प्रथमच दर्शन महाराष्ट्रातील या प्रजातीच्या नोंदींचा विचार केला असता तिचे वितरण तुलनेने मर्यादित असल्याचे दिसून येते. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत ई-बर्डवर या पक्ष्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. याशिवाय धुळे आणि नाशिक परिसरातही तुरळक नोंदी आढळतात. मात्र, मध्य व पश्चिम विदर्भ, खानदेश, मराठवाडा ते मुंबई पर्यंत या पक्ष्याच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे दिसून येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande