साहेब, केवळ तांदळाची खिचडी कशी शिजणार ?
- शाळांची अडचण वाढली : दीड महिन्यानंतरही कडधान्ये व तेलाची प्रतीक्षा अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.) नव्या शैक्षणिक सत्राचे बिगुल वाजून तब्बल दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार अद्याप पूर्ण साहित्य
साहेब, केवळ तांदळाची खिचडी कशी शिजणार ?


- शाळांची अडचण वाढली : दीड महिन्यानंतरही कडधान्ये व तेलाची प्रतीक्षा

अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.)

नव्या शैक्षणिक सत्राचे बिगुल वाजून तब्बल दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार अद्याप पूर्ण साहित्यासह पोहोचलेला नाही. प्रशासन अखेर जागे होऊन मागील काही दिवसांपासून पोषण आहाराचा मुख्य घटक असलेला तांदूळ शाळांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, केवळ तांदळाने खिचडी शिजवायची कशी? तेल, मीठ, कडधान्ये आणि मसाले यांसारखे 'धान्यादी साहित्य' अद्याप न पोहोचल्याने शाळा प्रशासनासमोर मोठा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाच्या या धिम्या कारभारामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा उधारीच्या गर्तेत सापडल्या असून कर्जबाजारी झाल्या आहेत.

गेल्या शैक्षणिक सत्रातील मार्च महिन्यात शाळांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला होता. मार्चनंतर एप्रिल महिन्यापर्यंत शाळा सुरू असल्याने तोपर्यंत जुना सर्व साठा पूर्णपणे संपला होता. जून महिन्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर शाळांकडे एक दाणाही शिल्लक नव्हता. शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी स्थानिक दुकानदारांकडून पदरमोड करून किंवा उधारीवर धान्य त किराणा साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली. दररोज शेकडो विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने शाळांची आर्थिक बिघडली आहे.

इंधन निधीची प्रतीक्षा

शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी शाळांना इंधन निधी उपलब्ध करून दिला जातो. मागील अनेक महिन्यांपासून इंधन निधी न मिळाल्याने शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांची अडचण वाढली आहे. पावसाळ्याच्या दिवसात चुलीवर स्वयंपाक करणे कठीण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande