रायगडमध्ये 5,480 कोटींची गुंतवणूक; 4,413 रोजगारांच्या संधी
रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासह स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 उत्साहात पार पडली. या परिषदेत जिल
Investment of ₹5,480 crore in Raigad; 4,413 employment opportunities.


रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासह स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 उत्साहात पार पडली. या परिषदेत जिल्ह्यातील 73 उद्योगांसोबत तब्बल 5 हजार 480.93 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून 4 हजार 413 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली.

मोठ्या प्रकल्पांसोबतच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना आवश्यक सुविधा आणि भक्कम पाठबळ देण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. उद्योजकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ‘उद्योग सेतू’ उपक्रम राबविला जात असून, दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत ऑनलाइन बैठकीद्वारे तक्रारींचे निवारण केले जाते. या बैठकीस एमआयडीसी, महावितरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ व कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात.

रायगड जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून, त्यातून सहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 2024-25 आणि 2025-26 या सलग दोन वर्षांत जिल्ह्याने 100 टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य केले आहे. दरम्यान, 2025-26 मध्ये रायगडची वार्षिक निर्यात 51 हजार 809 कोटी रुपयांवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 21.27 टक्क्यांची वाढ झाली आहे. केमिकल्स, लोखंड-पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, मत्स्य उत्पादने आदींची प्रमुख देशांमध्ये निर्यात होत आहे.

औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी पनवेल वसाहतीतील रस्ते व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 23 कोटी, तर कामोठे एक्सप्रेस वीज फिडरसाठी 12.44 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मुरुड येथे 8.10 कोटी रुपयांचा बांबू क्लस्टरही मंजूर झाला आहे. या गुंतवणूक परिषदेमुळे रायगडच्या औद्योगिक विकासाला आणखी गती मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande