
मुंबई, 19 ऑगस्ट (हिं.स.) - जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन यांच्या वतीने सहा महिन्यांचा फोटोग्राफी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. छायाचित्रण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच फोटोग्राफीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभ्यासक्रमाचे नाव ‘Advanced Photography (Outdoor)’ असून त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने असून वर्ग मंगळवार आणि गुरुवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी २५ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन हे डि-नोव्हो श्रेणीअंतर्गत डीम्ड-टू-बी युनिव्हर्सिटी असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष छायाचित्रणाचा अनुभव आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी सर जे. जे. स्कूल ऑफ डिझाईन, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२२-२५१७२१७५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
यावेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच संबंधित अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी