
जळगाव, 19 ऑगस्ट (हिं.स.)जळगाव जिल्ह्यात गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद - २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्राची निर्यात वाढविणे आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणून उद्योग क्षेत्रासमोरील संधी व संभाव्य प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे
जळगांव जिल्हयातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देण्याबरोबरच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही गुंतवणूक परिषद दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एम.आय.डी.सी., जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राहणार आहेत.कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री, क्रीडा कल्याण विभाग श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्राचे विशेष आयुक्त वैभव वाघमारे तसेच जिल्हाधिकारी, रोहन घुगे, यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी इच्छुक असलेले गुंतवणूक करणारे उद्योजक उद्योग घटकांनी किंवा इतर व्यावसायिक यांनी जिल्हा उद्योग केंद्र जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर परिषदेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर