
कार्यक्रमात डॉ. वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान
लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र पोलीस आणि लातूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ या विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंकर-पार्वती मंगल कार्यालय, निजवंते नगर, थोडगा रोड, अहमदपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील विविध शाळांमधील तब्बल ६ हजार विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे, नगराध्यक्ष अॅड. स्वप्निल व्हते, तसेच मंचावर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे धर्मपाल गायकवाड, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, प्रा.अनिल चवळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी घालून करण्यात आली.
“आई-बापाचा श्वास निघून गेल्यावर भिंतीवरील फोटोतील आई-बाप जीव लावायला येणार नाहीत”- डॉ. वसंत हंकारे
‘न समजलेले आई-बाप... समजून घेताना’ या विषयावर बोलताना डॉ. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. ते म्हणाले, “आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. कारण आई-बापाचा श्वास निघून गेला, तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत. मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव असतात, ते म्हणजे आई-बाप.”
ते पुढे म्हणाले की, आई-वडिलांना समजून घेण्याची आता वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्यामुळे आई-बापाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आई-वडिलांना लाचार न करता त्यांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.“भविष्यात तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात, लाखो रुपये कमावले; पण ते पाहण्यासाठी जर तुमचे आई-बापच नसतील, तर त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग काय?” असा भावनिक प्रश्न उपस्थित करत त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून दिली.
‘मम्मी-पप्पा मला आवडत नाहीत’ म्हणण्याआधी दृष्टीकोन बदला लहानपणी आई-बाप आपल्यासाठी काय करतात, हे मुलांना चांगले माहिती असते. मात्र कॉलेजमध्ये गेल्यानंतर आई-बाप आपल्याला बंधनात ठेवतात, असा गैरसमज निर्माण होतो. त्यातूनच “आय हेट यू, मम्मी-पप्पा” अशी वाक्ये मुलांच्या तोंडून येऊ लागतात. हरवलेले पूर्वीचे आई-बाप पुन्हा मिळवायचे असतील, तर आई-वडिलांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असेही डॉ. हंकारे यांनी सांगितले. या हृदयस्पर्शी व्याख्यानाने विद्यार्थी आणि पालक भावूक झाले. उपस्थित अनेक मुलींनी अक्षरशः हंबरडा फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर अनेक आई-वडिलांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. अत्यंत भावनिक वातावरणात पार पडलेल्या या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षेवर अमोल तांबे यांचे मार्गदर्शन
कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि नैतिक शिक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे, व्यसनांपासून दूर राहणे तसेच महिला सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी कायद्याचे भान ठेवून जबाबदार नागरिक बनावे, असा संदेशही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis