जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून मनपा सभा गुंडाळली; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे विशेष सभा घेण्याची मागणी
लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : लातूर महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या सभेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा न करता सभा चुकीच्या पद्धतीने संपविल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

: लातूर महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या सभेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा न करता सभा चुकीच्या पद्धतीने संपविल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या सभेत लातूरकरांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यासाठी पुन्हा विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

शहरातील स्वच्छता, सुरळीत पाणीपुरवठा, विविध भागांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे यासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न, स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न, लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचा विषय तसेच अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या नावाने मोठे समाज मंदिर व वाचनालय उभारण्याचा विषय असे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत.

मात्र, ५ ऑगस्ट रोजी झालेल्या मनपा सभेत या विषयांना बगल देऊन इतर विषय अजेंड्यावर आणण्यात आले. तसेच विषयांचे योग्य पद्धतीने वाचन न करता सभा संपविण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सभागृहात चर्चाच न करणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान असल्याचे भाजपने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्टची सभा पुन्हा बोलावून लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे सर्व विषय सभागृहात चर्चेला घ्यावेत आणि त्यांना आवश्यक ती मंजुरी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर, नगरसेवक प्रेरणा होनराव, नगरसेवक गणेश गवारे, नगरसेवक अनंत गायकवाड, नगरसेवक सतीश मिरचे, नगरसेवक रविशंकर जाधव आणि नगरसेवक गिरीश पाटील उपस्थित होते.

लातूर शहरातील जनतेच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर महापालिका सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी आणि प्रलंबित विषय मार्गी लागावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande