
परभणी, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या आदेशान्वये परभणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या अध्यक्षतेत महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आली.
यावेळी तहसीलदार संदीप राजापुरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम, सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्यासह महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व जनसंपर्क अधिकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग वरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा, अपघातांचा धोका तसेच नागरिकांना होणारा त्रास याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेदरम्यान पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.
या भागातील अतिक्रमण हटणार
शहरातील जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड, पाथरी रोड, पारवा रोड ते जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, जुना पेडगाव रोड ते रायगड कॉर्नर ते झाकीर हुसेन शाळा, धार रोड ते मरिआई देवी मंदिर मार्ग, देशमुख गल्ली ते उघडा महादेव परिसर, एमआयडीसी रोड, गंगाखेड नाका ते साखला प्लॉट लोहगाव रोड या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis