
नाशिक, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। लढाईची वेळ आली की शेपूट घालण्याची भूमिका चालणार नाही. प्रत्येक विषय दिला जाईल आणि त्यावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करायचे आहे, असा स्पष्ट इशाराही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमकपणे, नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याचे संकेत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.
भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक बुधवारी नाशिकमधील पंचवटी येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये संपन्न झाली. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बूथ पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी, एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॅा. भारती पवार यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, मंत्री मेघना बोर्डीकर तसेच पक्षाचे आमदार, खासदार आणि विविध स्तरांवरील पदाधिकारी उपस्थित होते. तर स्थानिक पातळीवरील आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.
निवडणुकांसाठी मजबूत यंत्रणा हवी
ते पुढे म्हणाले की, एसआयआर प्रक्रियेत आपण नेमके कुठे कमी पडतो आहाेत? हे लक्षात घेऊन त्यावर काम करा. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ नेत्यांचे नियोजन किंवा मोठ्या सभा पुरेशा नसून प्रत्यक्ष बूथवर कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील संघटनात्मक कमतरता ओळखून त्यावर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील २५६ बूथवर एक व्यक्ती, एक बूथ या पद्धतीने काम करण्याचे प्रयत्न करण्यात आले असून, ९४ बीएलएची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही बूथवर अद्याप संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. प्रत्येक बूथवर जबाबदार कार्यकर्ता, मतदारांशी सातत्याने संपर्क आणि निवडणुकीच्या दिवशी प्रभावी यंत्रणा उभी करण्यावर त्यांनी भर दिला.
संघटन मजबूत करण्याचा निर्धार
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि बूथ स्तरापासून संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीतून आगामी राजकीय आव्हानांसाठी कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI