नाशिक म्हाडातर्फे २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ४१२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
नाशिक, १९ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, आडगाव शिवार, सातपुर शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, तपोवन लिंक रोड, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिव
Lottery


नाशिक, १९ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, आडगाव शिवार, सातपुर शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, तपोवन लिंक रोड, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिवार, सिन्नर फाटा, देवळाली शिवार, चेहडी, मेरी-रासबिहारी लिंक रोड, वडाळा शिवार येथील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतील ४१२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती श्री. रंजन ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी काढण्यात आली.

नाशिक मधील नाशिक मंडळाच्या गृहनिर्माण भवन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला श्री. रंजन ठाकरे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. शिवकुमार आवळकंठे, उपमुख्य अधिकारी श्री. प्रवीण बागूल, कार्यकारी अभियंता श्रीमती कविता निकम, कार्यकारी अभियंता श्रीमती वैशाली पवार, मिळकत व्यवस्थापक श्री. नितिन कुलथे, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य श्री. प्रकाश महाजन, उपजिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी श्री. रविंद्र भारदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. विक्रम नैन आदी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. रंजन ठाकरे म्हणाले की, म्हाडाची IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक, सोपी व सुलभ आहे. संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास वाव नाही. सदर सोडतीत घर न लागलेल्या अर्जदारांनी निराश न होता आगामी सोडतीत सहभाग नोंदवावा, म्हाडाच्या माध्यमातून भविष्यात आणखी परवडणारी घरे उपलब्ध होतील, असे श्री. रंजन ठाकरे यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री. शिवकुमार आवळकंठे म्हणाले की, म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सोडतीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असून अर्जदारांनी सदर निकाल बघण्याचे आवाहन श्री. आवळकंठे यांनी केले. यावेळी सोडतीच्या ठिकाणी उपस्थित यशस्वी अर्जदारांचा श्री. शिवकुमार आवळकंठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल @mhadaofficial पेजवरून करण्यात आल्याने अर्जदारांना घरबसल्या सोडतीचे थेट प्रक्षेपण बघता आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande