
* गावपातळीवर बालसुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची व युवकांमध्ये लैंगिक संवेदनशीलतेची मोहीम राबविण्याची गरज
पुणे, १९ ऑगस्ट (हिं.स.) : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, आरोपी हा पीडित मुलीच्या परिचयातील असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने मुलीची दिशाभूल करून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात उपलब्ध सर्व पुरावे, साक्षी आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपास पूर्ण करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे पाठपुरावा करावा, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची माहिती घेतली. तपास योग्य दिशेने सुरू असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नसरापूर येथील घटनेचा संदर्भ देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पीडित कुटुंबाला धीर देण्यासोबतच न्यायालयीन प्रक्रियेतही योग्य पद्धतीने पुरावे व साक्षी समोर आल्याने आरोपीला फाशीची शिक्षा झाली. त्याचप्रमाणे जुन्नर प्रकरणातही अपेक्षा आहे की, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी.
केवळ मुलींमध्ये प्रबोधन करून चालणार नाही;युवकांमध्ये लैंगिक संवेदनशीलतेची मोहीम राबविण्याची गरज
महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी केवळ मुलींमध्ये प्रबोधन करणे पुरेसे नाही. गावपातळीपर्यंत शासनाच्या यंत्रणा अधिक सक्रिय असणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांमध्ये लैंगिक संवेदनशीलता, जबाबदार वर्तन आणि महिलांचा सन्मान याबाबत सातत्याने जनजागृती करणे गरजेचे आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
समाजमाध्यमे आणि विविध माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या अश्लील व हिंसक आशयाचा तरुणांच्या मानसिकतेवर होणारा परिणामही गांभीर्याने तपासण्याची गरज आहे. अशा आशयामुळे लैंगिक हिंसेबाबत चुकीच्या कल्पना आणि विकृत मानसिकता वाढत असेल, तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
गावपातळीवर बालसुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची गरज
अल्पवयीन मुली आणि मुलांच्या सुरक्षेसाठी गावपातळीवर समुपदेशन, जनजागृती, तक्रार निवारण आणि तत्काळ हस्तक्षेपाची यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने संबंधित यंत्रणांशी चर्चा करून व्यापक मोहीम राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी