
लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना मिळणार असून मतदारसंघातील नऊ मंदिर व दर्ग्यांना तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मंजूर झाला आहे. माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी या धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळाल्यामुळे संबंधित मंदिर व दर्ग्यांच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीतून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, परिसर सुशोभीकरण, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सभामंडप, प्रकाश व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा विकसित करण्यास मदत होणार आहे. उदगीर-जळकोट मतदारसंघात विविध धर्मीयांच्या श्रद्धेची अनेक प्राचीन व ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. या स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबतच धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून नऊ मंदिर व दर्ग्यांना ‘क’ दर्जा मिळाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यामध्ये श्री स्वयंभू महादेव मंदिर वाढवणा (बु.) ता. उदगीर, श्री लक्ष्मीनारायण बालाजी मंदिर वाढवणा (बु.) ता. उदगीर, श्री विराट हनुमान मंदिर सुकणी ता. उदगीर, श्री संत जळोजी मळोजी महाराज मंदिर हंडरगुळी ता. उदगीर, चंदगमनी बुद्ध विहार वाढवणा ( खु.) ता. उदगीर, हजरत सय्यद खाजा बादशाह सदरोद्दीन दर्गा उदगीर, हजरत शहादावल साहेब उर्फ कोहेलतीफ दर्गा उदगीर, श्री महादेव मंदिर देवस्थान पाटोदा (बु.) ता.जळकोट, श्री खंडोबा मंदिर देवस्थान कोनाळी (डोंगर) ता. जळकोट या सर्व स्थळांना 'क' दर्जा देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे उदगीर-जळकोट मतदारसंघातील धार्मिक स्थळांचा विकास वेगाने होऊन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. शासनाच्या या निर्णयाचे विविध धार्मिक संस्था, पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांनी स्वागत केले असून, माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांने 'क' दर्जा मिळाल्याने भाविकांनी त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis