कांद्याच्या दरात हंगामातील उच्चांकी तेजी; नाशिकमध्ये ४,५४५ रुपयांपर्यंत भाव
नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)। शासनाने वाढवलेला कांद्याचा खरेदी दर, बाजारात घटलेली उन्हाळ कांद्याची आवक आणि दक्षिण भारतातील नवीन खरीप कांदा बाजारात दाखल होण्यास लागणारा वेळ, या त्रिसूत्रीमुळे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात सातत्यान
Record surge in onion prices rates reach ₹4,545 in Nashik.


नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)। शासनाने वाढवलेला कांद्याचा खरेदी दर, बाजारात घटलेली उन्हाळ कांद्याची आवक आणि दक्षिण भारतातील नवीन खरीप कांदा बाजारात दाखल होण्यास लागणारा वेळ, या त्रिसूत्रीमुळे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे. देवळा येथील सुनील आहेर मार्केट तसेच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डांगसौंदाणे उपबाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 4,500 ते 4,545 रुपये या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे.

गेल्या मार्च-एप्रिलमध्ये साठवलेला रब्बी (उन्हाळ) कांदा ऑक्टोबरपर्यंत देशाची गरज भागवतो. सध्या चाळींमधील साठा कमी होत असल्याने बाजारात आवक मंदावली आहे. तसेच सर्वसामान्य शेतकर्यांकडे कांदा राहिलेला नाही. काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली होती. केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर स्टॉक खरेदी दरात वेळोवेळी वाढ केल्याने खुल्या बाजारातील दरांनाही थेट आधार मिळाला आहे. कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशांतील सुरुवातीचे खरीप पीक बाजारात येण्यास विलंब होत आहे. डांगसौंदाणे व देवळा येथील व्यापार्यांकडून मिळणार्या चांगल्या दरांमुळे बागलाण व कळवण पट्ट्यातील शेतकरी आपला माल येथे आणत आहेत. कांद्याच्या या तेजीचा पुढील टप्पा पूर्णपणे सप्टेंबर महिन्यातील हवामानावर आणि पिकांच्या स्थितीवर अवलंबून असेल. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नवीन खरीप पिकाचे नुकसान झाल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमतींवर अधिक दबाव येईल.

सप्टेंबरनंतर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील मुख्य खरीप कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. चांगल्या प्रतीचा कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला तरच किमती नियंत्रणात राहू शकतील, असे जाणकारांनी सांगितले. देशांतर्गत बाजारात मागणी कायम असताना आवक घटल्याची परिणती आठ दिवसांत कांद्याचे दर सुमारे १३०० ते १४०० रुपयांनी उसळण्यात झाली. मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल ३७०० रुपये दर मिळाले. तर मनमाड बाजारात हाच दर ३९०० रुपयांवर पोहोचला. दीड वर्षात कांद्याला मिळालेला हा उच्चांकी दर आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक निम्म्याने घटली. चांगल्या प्रतीचा माल कमी असल्याने त्यास हे दर मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande