
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
जन्मापासून ते मरेपर्यंत माणुस औपचारिक, अनौपचारिक शिक्षण घेतच असतो. माणसाच्या सर्वांगीण विकासासोबतच विचारप्रवण व्यक्ती घडविणे हेच शिक्षणाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन जीएमएनआरडीचे माजी संचालक, अर्थशास्त्रज्ञ प्राचार्य डॉ.सर्जेराव ठोंबरे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विभागाचे संचालक डॉ.अश्विन रांजणीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, डॉ.आनंद वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत चार जिल्ह्यांतून १२० प्राचार्य, कार्यक्रमाधिकारी सहभागी झाले.
यावेळी प्राचार्य डॉ.सर्जेराव ठोंबरे म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरा ही अत्यंत उदात्त आणि प्राचीन आहे. जागतिक बंधुभाव हा या परंपरेचा आत्मा आहे. शिक्षणाने माणूस हा अधिक समाजशील व उत्तरदायी बनत असतो. आजीवन अध्ययन विभागच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास व सामाजिक परिवर्तनाचे कार्य घडत आहे, असेही डॉ.ठोंबरे म्हणाजे. तर आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे युनीट असलेल्या महाविद्यालयांनी अधिक प्रभावीपणे व नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा डॉ.प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते म्हणाले, पारंपारिक शिक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून महाविद्यालयीन आजीवन अध्ययन विभागाचे नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत. चार जिल्हयातून मिळून किमान १० हजार विद्यार्थी या ६० महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना प्रवेशित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. चार जिल्हयातील ६० महाविद्यालयात विभागाचे युनिट असून अनेक अभ्यासक्रम, उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ.अश्विन रांजणीकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis