
अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.) :
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे वर्गणी गोळा करण्याकरिता धर्मदाय उपआयुक्त किंवा सहायक धर्मदाय आयुक्त अमरावती यांची पूर्वपरवानगी घ्यावी, असे आवहन धर्मदाय सह आयुक्त दीपक खोचे यांनी केले आहे. पूर्व परवानगी शिवाय वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्या पर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलीत रकमेच्या दीडपट द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१-क नुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे गणेशोत्सव कार्यक्रमासाठी रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात पैसा,देणगी किंवा वर्गणी गोळा करण्याच्या पूर्वपरवानगीकरिता www.Charity.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून धर्मदाय उपआयुक्त किंवा सहायक धर्मदाय आयुक्त अमरावती यांच्या कडून पूर्वपरवानगी देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाई अर्ज पूर्ण भरावा व त्यासोबत गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेल्या ठरावाची प्रत, सर्व सदस्यांचे ओळखपत्र, जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, अर्जातील माहिती सत्य व बरोबर असल्याबाबत अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र, मागील वर्षीच्या परवानगीची प्रत आणि मागील वर्षाच्या जमा खर्चाचा हिशोब जोडणे गरजेचे आहे.
नियमाचे उल्लंघन करून पूर्व परवनगी न घेता वर्गणी गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास तीन महिन्या पर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलीत रकमेच्या दीडपट द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते असे धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी