
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी HCMTR (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) प्रकल्पाच्या प्रस्तावित ४३.६० किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गिकेची आज पाहणी करण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली.
यावेळी सोलापूर रस्ता ते साप्रस चौक या दरम्यानच्या HCMTR मार्गिकेशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची सद्यस्थिती, विविध चौकांमधील वाहतूक नियोजन तसेच प्रमुख रस्त्यांवरील रॅम्प जोडणी याबाबत संबंधित अधिकारी व प्रतिनिधींकडून माहिती घेण्यात आली.
प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. HCMTR मार्गिका प्रामुख्याने उन्नत स्वरूपाची असली, तरी शक्य त्या ठिकाणी जमिनीच्या पातळीवरील रस्त्यांचाही विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
HCMTR प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान मेट्रो, उड्डाणपूल आणि वाहतूक विभागांमध्ये समन्वय ठेवून पुढील नियोजन करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. विविध प्रकल्पांमुळे भविष्यात वाहतुकीवर परिणाम होऊ नये आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
या पाहणीदरम्यान मुख्य अभियंता (प्रकल्प), मुख्य अभियंता (पथ), बांधकाम विभाग आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु