
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स’च्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यास विरोध होत असल्याने डॉ. शोनाली वळसंगकर यांनी दाखल केलेला अंतरिम संरक्षणाचा अर्ज सोलापूर न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने संबंधित कागदपत्रांचा विचार करताना, डॉ. शोनाली या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा किंवा तेथे कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवले.
डॉ. शोनाली यांनी पती डॉ. अश्विन वळसंगकर, सासू डॉ. उमा वळसंगकर तसेच नणंद नेहा फडके आणि तिचे पती सुजय फडके यांच्यापासून अंतरिम संरक्षण मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ई-मेल आणि इतर कागदपत्रांनुसार त्यांचा रहिवासी पत्ता वेगळा असल्याचे समोर आले.
३१ डिसेंबर २०२४ नंतर डॉ. शोनाली यांचा ‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स’शी संबंध नसल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यांचे सध्याचे कामाचे ठिकाण जुने आरटीओ कार्यालयाजवळील भावना अपार्टमेंट येथे असल्याची माहितीही न्यायालयासमोर मांडण्यात आली.
दरम्यान, डॉ. उमा आणि डॉ. अश्विन वळसंगकर यांच्या वकिलांनी रुग्णालयाची इमारत ही व्यावसायिक संस्था असून, तिसरा मजला कर्मचाऱ्यांसाठी वापरला जात असल्याचा युक्तिवाद केला. डॉ. शोनाली यांचा ३१ डिसेंबर २०२४ पासून संस्थेशी संबंध नसल्याचेही त्यांनी कागदपत्रांच्या आधारे मांडले.
सुजय फडके आणि नेहा फडके हे न्यायालयात हजर नसल्याने त्यांच्याबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील मालमत्ता, रुग्णालय आणि कौटुंबिक वादावरून विविध कायदेशीर प्रकरणे सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड