
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। मतदार यादी शुद्धीकरण आणि विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादी मॅपिंगचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांपैकी ३३ लाख २७ हजार ४८३ मतदारांचे अर्ज डिजिटायझेशन करण्यात आले आहेत. तर ६ लाख १३ हजार ६१० मतदार एसआयआर प्रक्रियेपासून अलिप्त राहिले आहेत.
अलिप्त राहिलेल्या मतदारांमध्ये मयत, स्थलांतरित, दुबार तसेच सध्या अनुपलब्ध असलेल्या मतदारांचा संभाव्य समावेश आहे. त्यामुळे या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया होणार आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदारांकडून दावे आणि हरकती मागवून सुनावणी घेतली जाणार आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख १७ हजार ६४ मतदार एसआयआर प्रक्रियेपासून अलिप्त राहिले आहेत. त्याखालोखाल सोलापूर शहर उत्तरमध्ये ६७ हजार ८०१, अक्कलकोटमध्ये ६५ हजार ६४३ आणि पंढरपूरमध्ये ६२ हजार २२७ मतदारांचा समावेश आहे.
सर्व दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे अलिप्त राहिलेल्या मतदारांच्या नावांबाबत होणाऱ्या सुनावणीनंतर नेमकी किती नावे वगळली जातात, याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड