
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसह सुमारे ३० कोटी रुपयांच्या ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीने घेऊन दोन महिने उलटले, तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची बाब महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. या विलंबामुळे महापालिकेला सुमारे ३० लाख रुपयांच्या व्याजाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडत ठेवींची रक्कम संबंधित बँकेत जमा करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यांपासून सुमारे ३० कोटींची रक्कम स्थायी समितीच्या निर्णयानुसार गुंतविण्यात आलेली नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या रकमेवर सुमारे सात टक्के व्याज मिळू शकले असते. दोन महिन्यांच्या विलंबामुळे अंदाजे ३० लाख रुपयांचे व्याज महापालिकेला गमवावे लागणार असल्याचा मुद्दा अमोल शिंदे यांनी उपस्थित केला. ठेवी न ठेवण्यामागील कारणांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि भाजपच्या नगरसेविका तथा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनीही या प्रकरणात खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले.
सध्या ही रक्कम सेव्हिंग खात्यात असून त्यावर साडेतीन टक्के व्याज मिळत असल्याचे मुख्य लेखापालांनी सांगितले. संबंधित ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड