
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
जागतिक विमान दिनानिमित्त सोलापूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. सोलापूर विज्ञान केंद्रात भारतीय वायु दलाचे दोन आसनी ट्रेनर जेट ठेवण्यात आले असून, त्याच्या जुळणीचे काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी आणि आसनांच्या कुशनचे काम पूर्ण झाल्यानंतर हे विमान लवकरच नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.
भारतीय वायु दलाच्या अधिकाऱ्यांनी जेटची जुळणी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जेटमध्ये बसून कॉकपिट, आसने तसेच विमानाची रचना जवळून पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विमानाच्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
विज्ञान केंद्रात सुमारे दीड हजार किलो वजनाचे क्रायोजेनिक इंजिनही ठेवण्यात आले आहे. विमानासोबतच अंतराळ आणि रॉकेट तंत्रज्ञानाची माहिती विविध उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे.
सोलापूर विज्ञान केंद्राची सुरुवात १४ फेब्रुवारी २०१० रोजी सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात झाली. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केंद्राला भेट दिली असून, दरवर्षी ३० हजारांहून अधिक पर्यटक येथे येतात. सध्या नागरिकांसाठी प्रवेश शुल्क ७० रुपये, तर विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सवलतीनंतर ३५ रुपये आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड