
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेत मतदार गणना अर्ज भरण्याच्या प्रमाणात पुणे जिल्ह्यात बारामती विधानसभा मतदारसंघाने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ आंबेगाव आणि जुन्नर मतदारसंघांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, पुणे शहरातील कोथरूड, खडकवासला आणि हडपसर मतदारसंघांत अर्ज भरण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे समोर आले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी ८८.२१ टक्के मतदारांनी मतदार गणना अर्ज सादर केले आहेत. पुणे जिल्ह्यातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. बारामतीनंतर आंबेगावमध्ये ८६.९३ टक्के, तर जुन्नरमध्ये ८५.७४ टक्के मतदारांनी गणना अर्ज भरले आहेत.
याउलट पुणे शहरातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये SIR मोहिमेला मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. खडकवासला मतदारसंघात ४६.८१ टक्के, कोथरूडमध्ये ४६.५१ टक्के, तर हडपसरमध्ये ४५.९४ टक्के मतदारांनी अद्याप मतदार गणना अर्ज सादर केलेले नाहीत.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये SIR मोहिमेच्या अंमलबजावणीच्या प्रतिसादात लक्षणीय फरक दिसून येत आहे. विशेषतः पुणे शहरातील कमी प्रतिसाद असलेल्या मतदारसंघांमध्ये गणना अर्ज भरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु