शाळा सुधारा’ अभियानातून लातूरमधील शाळांचे सोशल ऑडिट; अभिजीत दिपके करणार पाहणी
लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : सरकारी शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची प्रत्यक्ष स्थिती समाजासमोर आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांचे सोशल ऑडिट करण्य
अभिजित दिपके


लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

: सरकारी शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची प्रत्यक्ष स्थिती समाजासमोर आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांचे सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद आणि लातूर शहर महानगरपालिका शाळांना भेटी देणार आहेत.

या भेटीदरम्यान शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, शाळांची सद्यस्थिती तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर संबंधित शाळांचे सोशल ऑडिट करून आढळून आलेल्या समस्या आणि त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत.

उजनीपासून लातूर शहरापर्यंत पाहणी

अभियानांतर्गत गुरुवारी विविध ठिकाणी शाळांना भेटी देण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता उजनी येथील बाजार चौकातील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात येईल.

त्यानंतर सकाळी ११ वाजता एकंबी, ता. औसा येथील जिल्हा परिषद शाळेचे सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता औसा येथील जुन्या बसस्थानकाच्या मागील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे सोशल ऑडिट होणार आहे.

दुपारी २.३० वाजता लातूर शहरातील लेबर कॉलनी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लातूर शहर महानगरपालिका शाळा क्रमांक २६ येथे सोशल ऑडिट करण्यात येणार आहे.

शाळांची प्रत्यक्ष स्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, शैक्षणिक साहित्य, वीज, क्रीडा सुविधा आणि अन्य मूलभूत बाबींची स्थिती काय आहे, याचा प्रत्यक्ष आढावा या अभियानातून घेण्यात येणार आहे.

शाळांमधील समस्या केवळ कागदोपत्री न राहता त्या प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर आवश्यक कार्यवाही व्हावी, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचे CJPच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी जनजागृती

‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती समाजासमोर आणणे, शाळांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी जनजागृती करणे, हा अभियानाचा उद्देश आहे.

या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून अभियानाचे वार्तांकन करावे, असे आवाहन CJPचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande