
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीओटी प्रकल्पाच्या विषयावरून मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, महापौर विनायक कोंड्याल यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विषय सभागृहासमोर मांडत विरोधकांना अक्षरशः गार केले. बीओटीचा विषय एकमताने मंजूर करून महापौरांनी सभागृहात आपला ‘मास्टरस्ट्रोक’ दाखवून दिला.
बीओटी प्रकल्पावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, महापौर विनायक कोंड्याल यांनी नेहमीच्या चर्चेऐवजी ‘प्रेझेंटेशनच्या अस्त्राचा’ वापर करत सभागृहातील वातावरणच बदलून टाकले.
बीओटी प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी, प्रकल्पाची कार्यपद्धती, त्यातून होणारे फायदे, महानगरपालिकेचे हित आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा याबाबतची सविस्तर माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांसमोर मांडण्यात आली. त्यामुळे विषयाबाबत असलेल्या अनेक शंकांना जागेवरच उत्तरे मिळाली.
प्रेझेंटेशनदरम्यान प्रकल्पातील विविध बाबी स्पष्टपणे समोर आल्याने विरोधकांकडून होणारा संभाव्य विरोधही मवाळ झाला. त्यानंतर सभागृहात बीओटीचा विषय चर्चेला आला आणि अखेर हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
महत्त्वाचे म्हणजे, विषयावरून सभागृहात गोंधळ होईल, अशी शक्यता असताना महापौर कोंड्याल यांनी चर्चेला सकारात्मक दिशा देत निर्णय प्रक्रियेला गती दिली. त्यामुळे बीओटी प्रस्तावाच्या मंजुरीचे श्रेय महापौरांच्या नियोजनबद्ध भूमिकेला दिले जात आहे.
विरोधकांचा संभाव्य विरोध, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दूर करत बीओटी प्रस्ताव मंजूर करून घेणे हा महापौर विनायक कोंड्याल यांचा राजकीय आणि प्रशासकीय ‘मास्टरस्ट्रोक’ ठरल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड