विकासासाठी एल्गार; विकास मंचच्या आंदोलनाला सोलापूरकरांचा प्रतिसाद
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने आज जिल्हा परिषद आवारातील पूनम गेटसमोर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय तीव्र निषेध आंदोलनाला
Cj


सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने आज जिल्हा परिषद आवारातील पूनम गेटसमोर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय तीव्र निषेध आंदोलनाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सोलापूरच्या विकासासाठी आपला आवाज बुलंद केला. आंदोलनादरम्यान विमानसेवा, नाईट लँडिंग, नियमित पाणीपुरवठा, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि शहरातील रखडलेल्या विकासकामांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनातून होटगी रोड विमानतळावरील विमानसेवा सुरळीत व कायमस्वरूपी राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा, शहराला नियमित व ठरावीक वेळेत पाणीपुरवठा, सक्षम शहर बससेवा, कंबर तलाव–पत्रकार भवन पुलाचे रुंदीकरण, छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव ५४ मीटर रस्त्याचे रखडलेले काम सुरू करणे, हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मिलेट सेंटर सुरू करणे तसेच IT Park साठी जागा आरक्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यासोबतच शहरातील खड्डे व अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, दमाणी नगर मरिआई चौक पूल, आसरा पूल, दूषित पाणी, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व ७ चा विस्तार, सोलापूर–कोल्हापूर रात्रीची रेल्वेसेवा आणि महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड उभारण्याच्या मागण्याही मांडण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित २० ऑगस्टच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सोलापूरच्या विकासाचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते न राहता त्यावर ठोस आणि कालबद्ध कार्यवाही व्हावी, अशी भावना आंदोलनात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. “सोलापूरच्या विकासासाठी पक्ष, गट आणि मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी एकत्र येणे हीच या आंदोलनाची मोठी ताकद आहे,” अशी भूमिका सोलापूर विकास मंचच्या वतीने मांडण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande