परभणीत बालभारती प्रकाशित पुस्तकांच्या शिक्षक लेखकांचा ‘मसाप’तर्फे सन्मान
परभणी, 19 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाडा साहित्य परिषद शाखा, परभणीच्या वतीने अक्षरभेट उपक्रमांतर्गतराज्य शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने बालभारती प्रकाशित पुस्तकांच्या शिक्षक लेखकांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला
Q


परभणी, 19 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाडा साहित्य परिषद शाखा, परभणीच्या वतीने अक्षरभेट उपक्रमांतर्गतराज्य शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने बालभारती प्रकाशित पुस्तकांच्या शिक्षक लेखकांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. जीवन संस्कार विद्यालय, दत्तधामजवळ, वसमत रोड परभणी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कादंबरीकार बा. बा. कोटंबे होते.

बालभारतीच्या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य, संस्कार, कल्पनाशक्ती आणि जीवनमूल्ये पोहोचविणाऱ्या शिक्षक लेखकांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्र्यंबक वडसकर यांच्या ‘बालनाट्य’, मारुती डोईफोडे यांच्या ‘खासमखास दोस्त’, भानुदास धोत्रे यांच्या ‘आभाळाच्या मुली’, बबन आहाड यांच्या ‘माणूसपणाची वाट’ आणि डॉ. शरद ठाकर यांच्या ‘आभाळाचे स्वप्न’ या पुस्तकांचा विशेष उल्लेख करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात बा. बा. कोटंबे यांनी बालसाहित्याची भूमिका स्पष्ट करताना, बालसाहित्य म्हणजे केवळ मुलांचे मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या मनात विचार, संवेदना आणि संस्कारांची बीजे पेरणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, मोहन कुलकर्णी, राजेंद्र गहाळ, तुकाराम खिल्लारे, गंगाधर गायकवाड, अरविंद सगर, माणिक रासवे, बालासाहेब काळे, माधव गाढे, रत्नपारखे, मुस्ताक शेख, संतोष मारकळ, किरण पुरी, सुभाष पांचाळ, सोपान डोके, खेडकर, गडगिळे यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक डॉ. दिलीप शृंगारपुतळे, सुत्रसंचालन डॉ. सखाराम कदम तर आभार माणिक पुरी यांनी मानले. यावेळी साहित्य रसिक, शिक्षक, लेखक, साहित्यप्रेमी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी आपल्या अध्यापनासोबत साहित्यनिर्मिती करून बालविश्व समृद्ध करणे ही मराठी साहित्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कार्यक्रमामुळे परभणीच्या साहित्य क्षेत्रातील शिक्षक लेखकांच्या सर्जनशील कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, अक्षरभेट उपक्रमातून साहित्यिक आणि वाचक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले, अशी भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande