
अमरावती, १९ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती-भातकुली-दर्यापूर मार्गावरील पार्वतीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एलसी/3 जवळ रेल्वे विभागाने उभारलेल्या मोठ्या गतिरोधकांमुळे वाहनचालक व नागरिकांना होत असलेल्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने हे गतिरोधक समतल करण्यासोबतच रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता समतल केला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पार्वतीनगर रेल्वे क्रॉसिंग परिसरात चुकीच्या पद्धतीने मोठे गतिरोधक उभारण्यात आल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला होता. गतिरोधकांमुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
या समस्येची दखल घेत भाजपा किसान मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी रेल्वे विभागाचे एडीईएन राणे यांच्याशी फोनवर चर्चा करून सातत्याने पाठपुरावा केला. तसेच रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने उभारलेले गतिरोधक काढून नियमानुसार गतिरोधक बसवावेत, परिसरातील खड्डे बुजवावेत आणि रस्ता समतल करावा, अशी मागणी केली होती. तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
बांबल यांच्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पार्वतीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एलसी/3 परिसरातील मोठे गतिरोधक समतल केले. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता लेव्हल करण्यात आला.
अमरावती शहरातून भातकुली तालुक्यातील ग्रामीण भागासह दर्यापूरकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. रेल्वे प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे वाहनचालक व नागरिकांचा त्रास दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी मिलिंद बांबल यांचे अभिनंदन करून आभार मानले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी