
यवतमाळ, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। आदिवासी विद्यार्थिनींच्या जीविताची जबाबदारी असलेल्या आश्रमशाळेतच सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसेल, तर जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत जपतलाई येथील घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील आदिवासी संघटनांनी केली आहे.घटनेतील दोषी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथे आदिवासी आश्रमशाळेत घटना घडण्यापूर्वी आश्रमशाळेत सर्पदंश टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था कशी होती आणि आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी काय व्यवस्था होती, याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
केवळ घटनेची नोंद करून प्रकरण संपविण्याऐवजी त्यामागील कारणे आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आश्रमशाळेची सुरक्षा तपासणी करावी, विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेसे बेड उपलब्ध करून द्यावेत, सर्पदंश प्रतिबंधक उपाय करावेत, परिसराची नियमित पाहणी करावी तसेच आपत्कालीन वैद्यकीय उपचाराची व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित विभागाने ठोस कार्यवाही करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. निवेदन देताना आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे होमदेव किनाके, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रवीण मडावी, गोंडवाना पार्टीचे हरिभाऊ पेंदोर, आदिवासी परधान समाज संघटनेचे उत्तम कोवे, आदिवासी कोलाम समाज संघटनेचे संदीप कोवे, आदिवासी टायगर संघटनेचे बंडू तोडसाम, कोयापुनेम गोटुल समितीचे बुधाराम दडांजे यांच्यासह जयवंत आडे, महादेव सिडाम, विलास चिकराम, पुंडलिक आत्राम तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी