
परभणी, 19 ऑगस्ट (हिं.स.)। बोरी येथून जवळच असलेल्या कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्डयात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला बुधवारी यश आले. आदनान नदीम शेख असे रेस्क्यू करण्यात आलेल्या बालकाचे नाव असून त्यास पुढील उपचारासाठी तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास कौसडी शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये ही घटना घडली. बालक आईसोबत शेतात गेले होते. शेतात कामे सुरू असताना बालक बोअरवेलच्या खड्डयात पडल्याचे निदर्शनास आले. घटना घडल्याचे लक्षात येताच आई व नातेवाईकांनी आरडाओरड केली. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे गावात माहिती देण्यात आली. काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. व बचाव कार्याला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य, महसूल प्रशासनाच्याअधिकारी - कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कौसडी, बोरी, जिंतूर तसेच परभणी येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनानेही घटनेची गंभीर दखल घेत बचावकार्याला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार हे स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते. कौसडीचे सरपंच शेख मोबीन, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी बचावकार्यात मोठे योगदान दिले. परिसरातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर अथक प्रयत्नांनंतर बालकाला बोअरवेलच्या खड्डयातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. बालकास रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis