
पत्नीमुळे डायलिसीसवरच्या रूग्णाला मिळाले जीवनदान
अमरावती, १९ ऑगस्ट(हिं.स.) : विवाहाच्या वेळी सुख-दुःखात साथ देण्याची घेतलेली शपथ अकोला जिल्ह्यातील हर्षदा विनोद आंबेकर यांनी कृतीत उतरवून दाखविली. पतीच्या जीवावर बेतले असताना स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता अवघ्या २७व्या वर्षी त्यांनी आपली एक किडनी पतीला दान केली. त्यांच्या या त्यागामुळे दोन वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या ३८ वर्षीय विनोद आंबेकर यांना नवजीवन मिळाले.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ७६वे किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. अकोला जिल्ह्यातील सारकिन्ही येथील विनोद महादेवराव आंबेकर हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मागील दोन वर्षांपासून त्यांच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. डायलिसिसचा वाढता त्रास आणि दीर्घकाळ उपचारांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती लक्षात घेता किडनी प्रत्यारोपण हाच पर्याय असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.
ही माहिती मिळताच हर्षदा यांनी पतीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक वैद्यकीय तपासण्या व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची एक किडनी विनोद यांना प्रत्यारोपित करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून विनोद यांची प्रकृती सुधारत आहे. डायलिसिसच्या वेदना आणि अनिश्चिततेतून त्यांची सुटका झाली असून त्यांना नव्या आयुष्याची आशा मिळाली आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हर्षदा यांच्या त्यागामुळे केवळ एका रुग्णाला नवजीवन मिळाले नाही, तर पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पणाची हृदयस्पर्शी कहाणीही समोर आली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी