
वर्धा, 19 ऑगस्ट (हिं.स.)। महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरच्या लोगोचे अनावरण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी वर्धा शहरात या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. १५ वर्षावरील प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतील. लोगो अनावरण प्रसंगी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिवीक्षाधिन अधिकारी शोभिका पाठक तसेच विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती व जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभागामार्फत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त मृद व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. वॉकेथॉनमध्ये प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महा वॉकेथॉनमध्ये क्युआर कोड स्कॅन करून सहभागासाठी नोंदणी करता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सकाळी ७ वाजता मान्यवरांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात होईल. महात्मा गांधी चौक, विश्रामगृह, जिल्हा परिषद समोरून मार्गक्रमण करत महा वॉकेथॉन पुन्हा आंबेडकर चौकात येईल व समारोप होईल.
-----------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी