
* भारतीय पर्यटकांसाठी मलेशियाचे दरवाजे अधिक खुले; क्वालालंपूरसह लंगकावी, पेनांग आणि सारावाकला भेट देण्याचे आवाहन
मुंबई, १९ ऑगस्ट (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या क्षेत्रात भारतीय बाजारपेठेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन 'टूरिझम मलेशिया'ने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपला विस्तार अधिक वेगाने सुरू केला आहे. 'व्हिजिट मलेशिया २०२६' मोहिमेचा कालावधी आता २०२७ पर्यंत वाढवण्यात आला असून, याअंतर्गत १२ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान चेन्नई, मुंबई आणि नवी दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये 'सेल्स मिशन सिरिज २' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे भारतीय पर्यटकांना केवळ पारंपरिक क्वालालंपूर आणि जेंटिंग हायलॅंड्स पुरते मर्यादित न ठेवता, मलेशियातील इतर निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांची सफर घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
टूरिझम मलेशियाचे महासंचालक मोहम्मद अमिरुल रिझाल अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वाखाली आणि 'बॅटिक एअर'च्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. या व्यापार मोहिमेत ट्रॅव्हल ऑपरेटर्स, हॉटेल व्यावसायिक आणि विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींसह ४७ मलेशियन पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला आहे. भारत आणि मलेशियादरम्यान सध्या दरआठवड्याला १९० पेक्षा जास्त थेट उड्डाणे सुरू असून, त्याद्वारे दरआठवड्याला ३७ हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक क्षमता उपलब्ध आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना टूरिझम मलेशियाचे महासंचालक मोहम्मद अमिरुल रिझाल अब्दुल रहीम म्हणाले, भारत ही टूरिझम मलेशियासाठी सर्वात महत्त्वाची आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बदलते वातावरण पाहता भारतीय पर्यटकांसाठी मलेशिया ही पहिली पसंती राहावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. क्वालालंपूरव्यतिरिक्त सारावाक, लंगकावी, पेनांग, जोहोर आणि सबाह यांसारख्या ठिकाणांमध्ये प्रचंड क्षमता आहे. निसर्ग, साहसी पर्यटन, बेट सफारी, सांस्कृतिक वारसा, खरेदी तसेच 'डेस्टिनेशन वेडिंग' आणि व्यावसायिक परिषदांसाठी ही ठिकाणे उत्तम पर्याय ठरत आहेत.
डिसेंबर २०२३ मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश सुरू केल्यानंतर २०२५ मध्ये तब्बल १५ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली आहे. त्यामुळे सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया आणि चीनच्या बरोबरीने भारत मलेशियाच्या आघाडीच्या पाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सामील झाला आहे. हीच सकारात्मक गती २०२६ आणि २०२७ मध्येही कायम ठेवण्यासाठी विशेष आणि स्पर्धात्मक ट्रॅव्हल पॅकेजेस सादर केली जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी