रायगडच्या विकासासाठी अधिक जबाबदारीने काम करणार : पालकमंत्री भरतशेठ गोगावले
रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर रोजगार हमी योजना मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी महायुती सरकारचे आभार मानत रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्
Will work with greater responsibility for the development of Raigad: Guardian Minister Bharatsheth Gogawale


रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर रोजगार हमी योजना मंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी महायुती सरकारचे आभार मानत रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पालकमंत्रीपद ही केवळ पदाची जबाबदारी नसून रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार तसेच संपूर्ण महायुती सरकारचे गोगावले यांनी मनापासून आभार मानले. आतापर्यंत मंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आलो असून, आता रायगड जिल्ह्याच्या जनतेसाठी अधिक जबाबदारीने काम करून पालकमंत्रीपदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“रायगड ही माझी मायभूमी आणि कर्मभूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत वाढलो असून, येथील जनतेने मला प्रेम, विश्वास आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली,” असे गोगावले यांनी म्हटले. महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना आता संपूर्ण रायगड जिल्ह्याची सेवा करण्याची जबाबदारी मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवरायांच्या पावन भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या प्रत्येक तालुक्याचा, गावाचा आणि नागरिकाचा विकास साधण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील विकासकामांना गती देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील जनता आणि शिवसैनिकांनी आतापर्यंत दिलेल्या साथीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हीच साथ आणि आशीर्वाद संपूर्ण रायगडच्या विकासासाठी घेऊन पुढे जाणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. “पालकमंत्रीपद माझ्यासाठी केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आणि जबाबदारी आहे. या संधीचे नक्कीच सोने करीन,” असा विश्वास नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande