
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ई-पिंक रिक्षा योजने’च्या शासन अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. ई-रिक्षा खरेदीसाठी यापूर्वी मिळणारे २० टक्के शासन अनुदान आता ४० टक्के करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार योजनेतील आर्थिक रचनेत बदल करण्यात आला असून, नव्याने पात्र ठरणाऱ्या महिलांना ई-रिक्षाच्या किमतीच्या ४० टक्के शासन अनुदान मिळणार आहे. यामध्ये लाभार्थीचा स्वहिस्सा १० टक्के, शासन अनुदान ४० टक्के आणि कर्जाचा हिस्सा ५० टक्के राहणार आहे.
दरम्यान, यापूर्वी २० टक्के शासन अनुदान घेऊन ई-पिंक रिक्षा प्राप्त केलेल्या लाभार्थी महिलांनाही वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अशा लाभार्थींना अतिरिक्त २० टक्के शासन अनुदानासाठी दावा करता येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी नोंदणी, अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी, मंजुरी तसेच इतर संबंधित प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील योजनेस पात्र महिलांनी अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक व परिपूर्ण स्वरूपात भरून विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
यापूर्वी २० टक्के शासन अनुदानावर ई-रिक्षा प्राप्त केलेल्या लाभार्थींनी पोर्टलवरील ‘Additional Anudan Dava’ या सुविधेचा वापर करून अतिरिक्त २० टक्के अनुदानासाठी ऑनलाइन दावा सादर करावा. यासाठी पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
योजनेची अधिकृत व अद्ययावत माहिती तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी wcdpinkerrickshaw.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु