मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या, मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे. त्यानुसार संबंधित
collector dudi


पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या, मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे. त्यानुसार संबंधित कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून त्यांची सुधारित माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून, पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत असून, महाआयटीमार्फत आतापर्यंत १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी १३.४८ लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे.

पहिल्या यादीतील काही शेतकरी आधार प्रमाणीकरण होण्यापूर्वीच मयत झाल्याचे संबंधित बँकांच्या निदर्शनास आले. शासनाच्या निकषानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नसल्याने अशा प्रकरणांसाठी विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेनुसार मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कायदेशीर वारसांची नोंद करण्यात येईल. त्यानंतर वारसांची आवश्यक माहिती व संबंधित कागदपत्रे योजनेच्या पोर्टलवर अपलोड करून कर्जखात्याची सुधारित माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. पात्र वारसांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या नियम व निकषांनुसार त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार असून, योजनेचा लाभ पात्र वारसांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande