
ठाणे, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। ठाणे शहर व जिल्ह्याच्या नागरी भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन काळू धरणाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविकांची मंत्रालयात लवकरच विशेष संयुक्त बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वन मंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी आज येथे दिली. या संदर्भात भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी निवेदन दिले होते.
संपर्क मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार गडकरी रंगायतन येथे आज पार पडला. त्यावेळी भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी निवेदन दिले. या वेळी आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक नारायण पवार, संजय वाघुले, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांची उपस्थिती होती.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ३२ लाखांपर्यंत पोचल्याचा अंदाज आहे. तर ठाणे शहरालगतच्या नागरी पट्ट्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ शहरातही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येत वाढ झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असतानाही, ठाणे शहरातील काही भागाला तीव्र पाणीटंचाईची झळ बसली आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यात ठाणे महापालिकेचे स्वत:चे मालकी हक्काचे धरण नसल्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्याचा फटका भविष्यातही बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काळू धरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, असे नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर धरणाच्या उभारणीतील अडचणी, तांत्रिक मुद्दे आदींबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील नगरसेवक-नगरसेविका यांची संयुक्त विशेष बैठक मंत्रालयात आयोजित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. त्यावर लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर