पिंपरी-चिंचवडमधील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा - जिल्हाधिकारी
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : पिंपरी-चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित २२ कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. पुणे-नाशिक महामार्गावर
PCMC


पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

: पिंपरी-चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित २२ कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादन तसेच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड येथील विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक क्रमांक १ व २ तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने डीपी रोडमधील मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी आवश्यक ३० टक्के रक्कम भरण्याची तरतूद करावी. भूसंपादन प्रक्रियेसाठी मोजणीची तारीख निश्चित करून सर्व ठिकाणची मोजणी एकाच दिवशी पूर्ण होईल, याचे नियोजन करावे. जमीन ताब्यात देण्यासाठी निश्चित केलेली वेळमर्यादाही संबंधित विभागांनी पाळावी.

भूसंपादनाशी संबंधित सर्व बाबींचे समन्वयाने नियोजन करून मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन येणारे अडथळे तातडीने दूर करावेत. त्यामुळे डीपी रोड मिसिंग लिंकची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करता येतील, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका आणि संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यास पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मोठी मदत होईल, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

बैठकीत मौजे चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, तळवडे, बोराडेवाडी, मोशी, चोवीस, चिखली आणि वडमुखवाडी येथील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande