कोल्हापूर - आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगित
कोल्हापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात 1 हजार 400 नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया सध्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकष व अटी-शर्ती लागू झाल्याने नव्याने निवड प्
कोल्हापूर - आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगित


कोल्हापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात 1 हजार 400 नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया सध्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकष व अटी-शर्ती लागू झाल्याने नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

यापूर्वीच्या जाहिरनाम्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 400 केंद्रांच्या वाटपासाठी एकूण 3 हजार 617 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून प्रारूप यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती घेऊन मुलाखती घेण्याचे नियोजन प्रस्तावित होते.

दरम्यान, 9 जुलै रोजी आपले सरकार सेवा केंद्र' वाटपाबाबत नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. या निर्णयातील सुधारित निकष व अटी-शर्ती नवीन केंद्रांच्या निवडीसाठी लागू असल्याने यापूर्वी सुरू असलेली प्रक्रिया पुढे राबविणे शक्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्याची प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर स्थगित ठेवण्यात येत आहे.

नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकषांसह नव्याने जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांना नव्याने ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande