
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांचे ठसे स्पष्टपणे नोंदविता न येणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, महाआयटीमार्फत प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत १६.९६ लाख पात्र लाभार्थी असून, त्यापैकी १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
वयस्कर शेतकरी तसेच बोटांचे ठसे नोंदविता न येणाऱ्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
यादीत समाविष्ट लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात (ASSK) जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे पोर्टलवर कर्जखात्याची माहिती तपासून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटांच्या ठशांद्वारे आधार प्रमाणीकरणाचा प्रयत्न करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु