
लीमा, 21 ऑगस्ट (हिं.स.)।पेरूमध्ये स्थानिक वेळेनुसार गुरुवारी (२० ऑगस्ट) जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामुळे सध्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (युएसजीएस),या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या सुमारे ९९ किलोमीटर खोलीवर होता. हा केंद्रबिंदू अँडीज पर्वतीय क्षेत्रातील अॅनिसो शहराच्या सुमारे ३१ किलोमीटर वायव्य दिशेला होता. दक्षिण पेरूमधील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. इका आणि अरेक्विपा या भागांचाही त्यामध्ये समावेश आहे.
पेरूच्या नागरी संरक्षण विभागाचे प्रमुख लुईस वास्केझ यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही नुकसानीची नोंद झालेली नाही. परिनाकोचास प्रांताचे महापौर योनी रेयेस यांनीही प्रांतीय राजधानीत कोणत्याही नुकसानीची माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.पेरूच्या नौदलाने या भूकंपानंतर सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रभावित भागातील परिस्थितीवर अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
पेरू हा प्रशांत महासागराभोवती पसरलेल्या ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ या भूकंपप्रवण पट्ट्याचा भाग आहे. या भागात टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. पेरूच्या इतिहासात अनेक मोठे भूकंप झाले आहेत. २००७ मध्ये इका परिसरात आलेल्या ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात सुमारे ६०० जणांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode