
परभणी, २२ ऑगस्ट (हिं.स.) : ब्राह्मण समाजातील तरुणांनी कौशल्य विकासावर भर देऊन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात भरीव मदत केली जाणार आहे. समाजाने एकत्रित येऊन आपल्या समस्या शासन दरबारी मांडल्यास विकासाला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले कॅप्टन आशिष दामले यांनी केले.
परभणी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सरदेशपांडे हुरडा पार्टी येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन आशिष दामले होते. यावेळी पुण्याचे विश्वजित देशपांडे, कोल्हापूरचे मकरंद कुलकर्णी, जालन्याचे सुरेश मुळे, छत्रपती संभाजीनगरचे सचिन वाडे-पाटील, गंगाखेडचे संजय सुपेकर आणि नांदेडचे निखिल लातूरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कॅप्टन दामले म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. ब्राह्मण समाजातील तरुणांनी कौशल्य विकासावर भर देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. उच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल.
“विकसित समाज झाल्यास राष्ट्र अधिक बलवान होते. त्यामुळे समाजाच्या एकत्रित समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक जिल्ह्यात ‘भगवान परशुराम भवन’ उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगत समाजाची संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे कॅप्टन दामले यांनी स्पष्ट केले.
विश्वजित देशपांडे यांनी ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. वेदाध्ययन करणाऱ्यांचा सन्मान व्हावा तसेच देवस्थान इनामी शेतजमिनींचे अधिकार मिळवून देवस्थानांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
सुरेश मुळे यांनी समाजाला एकसंघ करण्यासाठी लवकरच महाराष्ट्रभर ‘ब्राह्मण संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
विद्यार्थ्याला ७५ हजारांची शैक्षणिक मदत
बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील उपस्थित ब्रह्मवृंद आणि महिला भगिनींच्या वतीने कॅप्टन आशिष दामले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब्राह्मण समाजातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हर्षल हेमंत आसेगांवकर यांना शैक्षणिक मदतीसाठी मान्यवरांच्या हस्ते ७५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश जोशी सोनपेठकर यांनी केले, तर सूत्रसंचालन समुपदेशक विश्वंभर काठवटे यांनी केले. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश जोशी सोनपेठकर, सचिन सरदेशपांडे, दीपक कासांडे, नंदकुमार पराडकर, विठू गुरु वझूरकर आणि विश्वंभर काठवटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis