नाशिकमध्ये ‘समर्पण दीप अध्यात्म महोत्सवा’निमित्त विहंगम योगाचा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम
नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)। अलास्का बँक्वेट हॉल्स अँड लॉन्स, चांदसी, नाशिक येथे विहंगम योग संत-समाजाच्या वतीने ‘समर्पण दीप अध्यात्म महोत्सवा’निमित्त अभूतपूर्व आध्यात्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जिज्ञासू व साधकांची
A grand spiritual program


नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)। अलास्का बँक्वेट हॉल्स अँड लॉन्स, चांदसी, नाशिक येथे विहंगम योग संत-समाजाच्या वतीने ‘समर्पण दीप अध्यात्म महोत्सवा’निमित्त अभूतपूर्व आध्यात्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जिज्ञासू व साधकांची उपस्थिती लाभली.

विहंगम योग संत-समाजाचा ‘समर्पण दीप अध्यात्म महोत्सव’ हा १०३ वा वार्षिकोत्सव येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी स्वर्वेद महामंदिर धाम, वाराणसी येथे साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त अतिविशाल २५,००० कुंडी स्वर्वेद ज्ञान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी विहंगम योगाचे सद्गुरू उत्तराधिकारी सुपूज्य संत प्रवर श्री. विज्ञानदेवजी महाराज यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी राष्ट्रव्यापी ‘समर्पण दीप’ दिव्य संदेश यात्रा सुरू आहे. या यात्रेचे नाशिक शहरात आगमन झाले होते.

यावेळी सुपूज्य संत प्रवर श्री. विज्ञानदेवजी महाराज यांनी आपल्या दिव्य वाणीतून ‘समर्पण दीप’ आणि यज्ञ-हवनाचे महत्त्व, तसेच विहंगम योगाच्या सिद्धांताचे निरूपण केले. नियमित विहंगम योग साधना केल्याने होणारे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ त्यांनी उपस्थितांना सुस्पष्टपणे समजावून सांगितले.

महाराजांच्या पावन उपस्थितीत ध्यान-साधनेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थित साधक व जिज्ञासूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमास राष्ट्रीय संत श्री. किशनलाल शर्मा, श्री. संतोष पाटील, श्री. राजेंद्र शिंदे, श्री. नितीन रायरीकर, श्री. रवी महामिने, श्री. प्रशांत पाटील यांच्यासह नाशिक तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेले सामाजिक, औद्योगिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे नाशिक शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, ‘समर्पण दीप’ संदेश यात्रेला साधक व जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande