लातूर - पावसाअभावी बोथी शिवार करपले
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाने पाठ फिरवल्याने बोथी परिसरातील शेतशिवारातील पिके सुकू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिकांची दयनीय अवस्था पाहण्यासाठी शेताकडे जाण्याचेही मन धजावत नसल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. काही
पीक करपली


लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाने पाठ फिरवल्याने बोथी परिसरातील शेतशिवारातील पिके सुकू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिकांची दयनीय अवस्था पाहण्यासाठी शेताकडे जाण्याचेही मन धजावत नसल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध आहे, मात्र वीजपुरवठ्याची लाईन नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही शेतकऱ्यांनी बसवलेले सौर पंपही सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित क्षमतेने चालत नसल्याने सिंचनात मोठ्या अडचणी येत आहेत.

शेतातील सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी कोमेजली असून अनेक ठिकाणी पाने पिवळी पडून ती करपण्याच्या मार्गावर आहेत. मोठ्या कष्टाने पेरणी आणि मशागत केल्यानंतर पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाणी असूनही वीज नसल्याने पिकांना देता येत नाही आणि पाऊसही हुलकावणी देत आहे. त्यामुळे केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत

आहे.

पावसाने अशीच पाठ फिरवली तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून वीजपुरवठा सुरळीत करावा आणि मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande