
रत्नागिरी, 23 ऑगस्ट (हिं.स.) । संगमेश्वर येथील स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या वस्त्रदान योजनेच्या पहिल्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील दानशूर व्यक्तींनी उपलब्ध करून दिलेले सुस्थितीतील जुने-नवे कपडे लांज्यातील भाकर संस्थेतील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना वितरित करण्यात आले.
भाकर संस्था संचालित वृद्धाश्रमात सध्या २० वयोवृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध झालेली वस्त्रे त्यांना देण्यात आली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हा उपक्रम साकारला असून, गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी भाकर संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, हितचिंतक प्रदीपकुमार बेंडखळे, स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश्चंद्र फेपडे, संस्थापक व कार्यवाह सचिव दीपक फेपडे, सभासद गंगाराम फेपडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन रविकांत शिंदे, उपाध्यक्ष व खजिनदार मनीष चोचे, नावडी-संगमेश्वरचे सरपंच विवेक शेरे तसेच माजी झोन चेअरमन गुलामभाई पारेख उपस्थित होते.
‘दानातून सेवा आणि सेवेतून स्नेहबंध’ हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढेही आपल्या परीने चांगले कपडे उपलब्ध करून देत या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशन आणि लायन्स क्लबतर्फे करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी