
परभणी, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या १०० नवीन शाखा, १०० आरोग्य शिबीर आणि १० हजार नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आरपी हॉस्पिटल सभागृहात बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे माजी, आमदार मीराताई रेंगे पाटील, शिवसेना महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, कल्याणराव रेंगे पाटील, राम खराबे पाटील, अंबिका डहाळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, जिल्हाभरात शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात शंभर शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात १०० आणि पुन्हा शंभर अशा एकूण ३०० शाखांची स्थापना नव्याने होणार आहे. त्यासोबतच १०० आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांना त्यांच्या गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच २३ जानेवारीपर्यंत १० हजार जणांची नेत्र तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ९० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शब्दाला जागून शक्य तेवढे सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायचे आहे, असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे म्हणाले, सत्तेत असलेल्या पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील सरकारच्या धोरणांवर टीका करू लागली आहेत. केवळ चौकशीच्या भीतीपोटीच ते सत्ता पक्षात आहेत आपल्याकडे प्रवेश करणे अनेक जण इच्छुक आहेत. भविष्यात अनेक प्रवेश परभणी जिल्ह्यात पाहायला मिळतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.बैठकीत माजी आमदार मीराताई रेंगे पाटील, डॉ. नावंदर, कल्याणराव रेंगे, अंबिका डहाळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis