कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीची नवी दिशा; चित्रनगरीत २५ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा
मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.) : चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चित्रनिर्मिती’ (Introductory AI Film Makin
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीची नवी दिशा; चित्रनगरीत २५ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा


मुंबई, 23 ऑगस्ट (हिं.स.) : चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चित्रनिर्मिती’ (Introductory AI Film Making Workshop) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर AI चा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया (Pre-Production), निर्मिती प्रक्रिया (Production), निर्मितीपश्चात प्रक्रिया (Post-Production) तसेच वितरण आणि विपणन (Distribution & Marketing) या विविध टप्प्यांमध्ये AI च्या माध्यमातून काम अधिक परिणामकारक आणि सुलभ करण्याच्या पद्धती सहभागींसमोर मांडल्या जाणार आहेत.

तेजस प्रभा विजय देऊस्कर (AI Film Maker), जगजीत सिंग (AI Take Expert) आणि प्रशांत ठाकूर (AI Producer) हे कार्यशाळेचे मार्गदर्शक आहेत.

AI आधारित चित्रनिर्मिती, पटकथा लेखन, दिग्दर्शन, छायांकन, दृश्य परिणाम (VFX), पोस्ट-प्रॉडक्शन आणि डिजिटल कंटेंट निर्मिती या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, केस स्टडी आणि संवादात्मक सत्रे कार्यशाळेत आयोजित करण्यात आली आहेत.

दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, छायाचित्रकार व कॅमेरा सहाय्यक, संकलक (Editors), पोस्ट-प्रॉडक्शन तज्ज्ञ, VFX कलाकार, मोशन डिझायनर, प्रॉडक्शन डिझायनर, लेखक, पटकथाकार, स्वतंत्र चित्रपट निर्माते तसेच चित्रपट शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे.

कार्यशाळेसाठी प्रशिक्षणार्थी शुल्क १,००० रुपये आकारण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande