

रायगड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। दूरशेत येथील पुलाच्या कामासाठी २०२१ पासून मागणी आणि २०२३ मध्ये मंजुरी मिळूनही पुलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात या पुलाच्या कामासाठी तब्बल ११.९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्ध असूनही काम रखडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दूरशेत ग्रामस्थांनी २०२१ मध्ये पुलाच्या दुरुस्तीची मागणी शासन तसेच तत्कालीन आमदारांकडे केली होती. पुलाची दुरवस्था लक्षात घेता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर २०२३ मध्ये पुलाच्या कामाला मंजुरी मिळाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र स्थानिक पातळीवरील राजकारण तसेच दूरशेत आणि खरोशी या दोन्ही गावांमध्ये आवश्यक समन्वयाचा अभाव असल्याने काम प्रत्यक्ष सुरू होऊ शकले नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या जुन्या पुलाचा कठडा नदीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पुलावरून विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे पुलाची दुरुस्ती अथवा नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. विशेषतः नवरात्रीच्या काळात खरोशी येथे कळंबा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळून वाहतूक कोंडीचा प्रश्नही कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
११.९ कोटी रुपयांची तरतूद असतानाही काम रखडणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी दृश्याच्या सरपंच दशरथ वामन यांनी केली आहे. पुलाचे काम लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)