
ठाणे, 23 ऑगस्ट (हिं.स.) । ठाणे जिल्ह्यातील अत्यंत प्रभावी आणि कट्टर हिंदुत्व व ध्येयवादी नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात मंगळवारी, दि. २५ ऑगस्ट रोजी ‘आनंद चित्र कथा’ होणार आहे.
परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्राचे प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा.लि आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या दोन सत्रात होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची, गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने के जी ते महाविद्यालयापर्यंत राज्यातील शासकीय महापालिका शाळा, खासगी शाळा आणि इतर शाळा तसेचे कला महाविद्यालयातील २५ हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘आनंद चित्रकथा’ होणार आहे. चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरोघरी आणि शाळाशाळांत झाली आहे.
या कार्यक्रमात कला व उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तर किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, पनवेल महापौर नितीन पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे नगरसेवक आणि बारटक्के फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप बारटक्के यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी