
अमरावती, 23 ऑगस्ट, (हिं.स.) - धारणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी यावे, अशी आग्रही मागणी केल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपर आयुक्तालयात दाखल होऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. उपस्थित असलेल्या गृहपालांबद्दल विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. २१ ऑगस्टपासून वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुलामुलींनी एटीसी कार्यालयासमोर अकरा मांगण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांची आक्रमकता कायम होती. सायंकाळपर्यंत सहाय्यक आयुक्त यांनी विद्यार्थ्यांनी चर्चेसाठी यावे म्हणून आग्रह धरला होता. पण गृहपालांच्या उपस्थितीत चार भिंतीच्या आड विद्यार्थी चर्चेसाठी तयार नसल्याचे पेच निर्माण झाला होता.
अखेर आदिवासी विकास विभाग, धारणीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुल्का हे सायंकाळी अपर आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी आधी वसतिगृहाच्या गृहपालांसोबत चर्चा केली. त्यानंतर गृहपालांसमोरच विद्यार्थ्यांच्या समन्वय समितीच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी अपर आयुक्तालयात बोलविले. यावेळी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत सुद्धा उपस्थित होते. आंदोलनातील बहुतांश मागण्या या वसतिगृहाच्या गृहपालांशी निगडित असल्याने विद्यार्थ्यांनी गृहपालाप्रती आपला रोष व्यक्त केला.
अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांच्यासोबतची चर्चा शनिवारी सायंकाळी आंदोलनस्थळीच झाली. ज्या न्या मागण्या आहेत त्या तातडीने मान्य केल्या जाईल. सोबतच महाडीबीटी आणि जीआर रद्द करणे हे विषय शासनाच्या अखत्यारीतील येत असल्याने त्यावर शासन निर्णय घेईल. असे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थी त्यानंतरही लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.
वसतिगृह प्रवेशासाठी विलंब होऊ नये वसतिगृह प्रवेश प्रकीयेसाठी शासन आदेशाची वाट न बघता गृहपालांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडून, डीबीटी संदर्भातील ज्या अडचणी आहेत, त्याही शासनाकडून लवकर मार्गी लागू शकतात. स्थानिक पातळीवरून गृहपालांनी विलंब केल्यास पुढील प्रक्रिया रखडत जाते. त्याबाबत गृहपालांनी सकारात्मक असावे. अशी भूमिका विद्यार्थ्यानी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडली. लेखी आश्वासनाची सुद्धा मागणी आंदोलकांनी केली.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी