अमरावतीत नेटवर्कअभावी डोंगरावर शिबिर; खडीमलमध्ये 250 ग्रामस्थांचा सहभाग
अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.)।अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातल्या अतिदुर्गम खडीमल गावात शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. नेटवर्कच्या समस्येमुळे हे शिबिर गावापासून तीन किलोमीटर दूर डोंगरावर घेण्यात आले.
नेटवर्कअभावी डोंगरावर शिबिर :खडीमलमध्ये 250 ग्रामस्थांचा सहभाग


अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.)।अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातल्या अतिदुर्गम खडीमल गावात शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. नेटवर्कच्या समस्येमुळे हे शिबिर गावापासून तीन किलोमीटर दूर डोंगरावर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर १५० जात प्रमाणपत्र प्रकरणांचे प्रस्ताव तयार करण्यात आले.

मेळघाटातील नागरिकांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक गाव विकास कार्यक्रम राबवला जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद, महसूल, वन आणि इतर विभागांच्या समन्वयातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. खडीमल ग्रामपंचायतीमध्ये नेटवर्क आणि विजेची उपलब्धता नसल्याने शिबिरासमोर मोठे आव्हान होते.

या अडचणींवर मात करत प्रशासनाने गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर, जिथे नेटवर्क उपलब्ध होते, अशा डोंगरावर शिबिर घेतले. दुर्गम भागातील नागरिकांनीही शासकीय सेवा मिळवण्यासाठी हे अंतर कापून शिबिरात हजेरी लावली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या नागरिककेंद्रित प्रशासनाच्या भूमिकेला अनुसरून हा उपक्रम राबवण्यात आला.

या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालय आणि टाटा समूह यांच्या समन्वयातून राबवण्यात आलेल्या या प्रकल्पात १५ आधार कार्ड, ४६ नवीन आयुष्मान भारत कार्ड, ५ डोमिसाईल प्रमाणपत्रे, ५ बँक खाती आणि २ फार्मर आयडी तयार करण्यात आले. तसेच, जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून १५० प्रकरणांचे संकलन करण्यात आले.काही ग्रामस्थांच्या जन्मनोंदी उपलब्ध नसल्यामुळे आधार कार्ड काढण्यात अडचणी आल्या, त्यामुळे आधार कार्डची संख्या मर्यादित राहिली. संबंधित नागरिकांना पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराला सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आधार ऑपरेटर, सेंट्रल बँकेचे कर्मचारी तसेच टाटा फाऊंडेशनतर्फे नियुक्त पाच ग्रामपंचायतींचे ग्राम सेवा समन्वयक उपस्थित होते. सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून नागरिकांना प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

नेटवर्क आणि वीज यांसारख्या सुविधांच्या मर्यादा असतानाही प्रशासनाने त्यावर मात करून दुर्गम भागातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिल्या. हा समन्वित प्रयत्न नागरिककेंद्रित प्रशासनाचे एक प्रभावी उदाहरण ठरला आहे.

------------------------------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande